श्री. अरुण अनंत देशपांडे

साधारण १९६० चे दशक … खो-खो क्षेत्रातील एका अरुणचा अरुणोदय … पुढे जाऊन खो-खो या देशी क्रीडा प्रकारात खूप मोठे काम करेल ह्याची कल्पना त्या तरुणाला पण नव्हती. पण तो योगच तसा होता. खो-खो क्षेत्राला खेळाडू, पंच, सांख्यिकी अशा विविध रुपात काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा प्रवेश झाला तो विद्युत क्रीडा मंडळात. असे या खेळातील बदलांचे साक्षीदार आणि मुरलेले व्यक्तिमत्व म्हणजे अरुण देशपांडे. १९६३ साली भरलेल्या पहिल्या कै. भाई नेरुरकर सुवर्ण चषक खो खो स्पर्धेचा साक्षीदार ते मुंबई खो खो संघटनेत उपाध्यक्ष हा प्रवास खडतर पण आनंददायी होता. मुंबई खो खो संघटनेत अनेक वर्ष पंच म्हणून काम करतांनाच तांत्रिक दृष्ट्या महत्वाच्या पण दुर्लक्ष गेलेल्या एका विषयाकडे म्हणजे सांख्यिक या क्षेत्रात त्यांनी १९७३ पासून लक्ष घातले. आज सर्व क्षेत्रात जो विदा (डेटा) गोळा केला जातो त्याची मुहूर्तमेढ १९७३ सालीच खो-खो खेळात त्यांनी सुरु केली. १९७७ मध्ये राष्ट्रीय खो-खो परीक्षेत पहिल्या पाच क्रमांकात मानाचे स्थान पटकावले. अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पंच म्हणून सहभाग. १९७६ साळी हैद्राबाद येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातर्फे सांख्यिकी म्हणून त्यांची निवड झाली. मुंबई महापौर चषक स्पर्धेत सांख्यिकी तज्ञ श्री. रमेश वरळीकर यांजसोबत स्पर्धा प्रसिद्धी म्हणून काम केले. राज्य सांख्यिकी मंडळातील एक महत्वपूर्ण स्थान म्हणजे अरुण देशपांडे. अनेक वृत्तपत्रात, राष्ट्रीय खो-खो स्पर्धा तसेच खो-खो विषयावर त्यांनी अभ्यासपूर्ण लेखन केले. अमर हिंद मंडळाच्या विविध खो-खो स्पर्धांच्या आयोजनात गेली ४० वर्षे त्यांचा सहभाग तर आहेच पण विविध पदांवर कार्यरत आहेत. सध्या मंडळाचे कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. १९८०-८३ या कालावधीत ते मुंबई खो खो कार्यकारिणीवर कार्यरत आहेत. २०१७ ते २०२० मुंबई खो खो संघटनेवर उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. या कार्याची दखल म्हणून २०१४ मध्ये त्यांना युआरएल फाउंडेशन तर्फे क्रीडा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.