मुंबई खो-खो संघटना

लेखक – अ‍ॅड. अरुण देशमुख (खो खो एक सर्वांगसुंदर भारतीय खेळ)

१९६२ साली स्थापन झालेल्या मुंबई खो-खो संघटनेचे नाव “मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ खो-खो विभाग” असे होते. पुढे दुहेरी सदसत्वाचा मुद्दा उपस्थित झाल्याने राज्य संघटनेने आदेश दिल्याप्रमाणे १९६८-६९ साली मुंबई खो-खो संघटना नावाने जिल्हा संघटना स्वतंत्र कार्यरत झाली. १९६२ मध्ये मुंबई खो-खो संघटना स्थापन झाली तरी राज्य संघटनेची रीतसर मान्यता १९६३-६४ मध्ये मिळाली व पहिली जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा १९६४-६५ मध्ये झाली. मुंबई खो-खो संघटनेची पहिली जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा १९ ते २४ डिसेंबर, १९६४ या कालावधीत भारतीय क्रीडा मंदिर, वडाळा येथे झाली. मुंबई खो-खो संघटनेचे मानचिन्ह श्री. यशवंत काजरोळकर यांच्या कल्पनेतून श्री. बाळा चव्हाण यांनी साधारणपणे १९७० च्या आसपास साकारलेले आहे. मुंबई खो-खो संघटना अधिकृत करण्याचे काम त्यावेळचे कार्यवाह श्री. दत्ताराम मोरे व अध्यक्ष श्री. दत्ता प्रधान यांच्यामुळे झाले.


मुंबई जिल्हा स्तरावरचा इतिहास
लेखक – अ‍ॅड. अरुण देशमुख (खो खो एक सर्वांगसुंदर भारतीय खेळ)
मुंबई मध्ये अनेक स्थित्यंतरे या खेळाने पहिली. पुरुषांच्या गटात १९५० च्या अगोदर श्री समर्थ व्यायाम मंदिर व अमर हिंद मंडळ यांचे नाव होते. ज्यात श्रीधर भोसले – अमर हिंद ; तर कुन्झारी वगळ, आनंद गोखले, सुमन म्हात्रे – श्री समर्थ हे खो-खोपटू मैदाने गाजवीत होती. १९५० ते १९६० मध्ये लोकसेना, विद्युत, अमर हिंद मंडळ व विजय क्लब यांचा दबदबा होता. १९६० ते १९८० पर्यंत विजय क्लब, सहकार कला क्रीडा विज्ञान केंद्र, युवक क्रीडा मंडळ, राष्ट सेवा दल, विद्यार्थी क्रीडा केंद्र या बरोबरच खटाव मिल्स स्पोर्टस क्लब, मोरारजी मिल्स, कोहिनूर मिल्स यासारखे संघही पुढे होते या वर्षात राजा जेस्ते (अनेक संस्थेतून खेळ), तुकाराम भोईर, राजा व मोहन आजगावकर(सर्व विजय), सुधाकर व प्रभाकर गिरमे, प्रकाश चव्हाण (सर्व विद्यार्थी), रघु नलावडे ​(युवक​), (अनंत भाताडे, विश्वनाथ मयेकर, प्रभाकर वाईकर, प्रभाकर परब, अनिल म्हात्रे, दिलीप भूलेस्कर इ. हि खो-खो अग्रेसर होती. १९८० च्या दशकात सरस्वती स्पोर्टस क्लब व विजय क्लबने उत्तम आघाडी मिळवली. ज्यांना युवक क्रीडा मंडळ, श्री स्पोर्टस क्लब, विद्यार्थी क्रीडा संघांनी उत्तम लढत दिल्या. या कालावधीत ​नितीन जाधव, पांडुरंग परब, बिपीन पाटील, विवेक आंब्रे, प्रकाश राणे, प्रदीप पाटील, रवींद्र सावंत, दीपक राणे, संजय गावकर, विकास पवार, दिनेश भट, प्रवीण सिंदकर, प्रदीप सिंदकर, महेंद्र सावंत, सुधाकर राउळ, शशिकांत मोरे हि नांवे अग्रेसर होती. १९९० च्या दशकात विजय क्लब व सरस्वती स्पोर्टस क्लबच्या सोबत विद्यार्थी क्रीडा केंद्रानेहि उत्तम बाजी मारली. यात मैदाने गाजवली तो मागील दशकातल्या खेळाडूंसोबत ललित सावंत, अवधूत पेडणेकर, एजाज शेख, प्रमोद गावंड, मंदार म्हात्रे, अजित यादव, पराग आंबेकर, राजेश पाथरे इ. सर्वांनी. याच काळात खालच्या गटातून दोन ताज्या दमाचे संघ वर आले ते म्हणजे श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादर व ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर, माहीम यांचे. पुढे पुढे तर खालील गटांमधील आघाडी राखत पुरुष गटात अंतिम फेरीत हमखास पोहोचणारे संघ अशी ख्यातीही या दोन संघांच्या खेळाडूंनी खेळाच्या जोरावर मिळवली. २००० पासून या संघातले बाबली वैद्य, विकास शिरगावकर, साकेत जेस्ते, मनोज वैद्य, प्रकाश रहाटे याबरोबर सरस्वतीचा सुधीर म्हस्के, विजयचा पवन घाग, मनिष बडंब हि नावे अग्रेसर आहेत. महिलांमध्ये सुरवातीला मुंबईचे काही संघ उदा. रुईया कॉलेज, लोकमान्य विद्या मंदिर, बालमोहन विद्यामंदिर असे संघ थेट राज्य स्पर्धेत सहभागी होत व पहिल्या तीन क्रमांकातही त्यांचा नंबर असे ! १९६० ते १९७० दरम्यान वरील संघाबरोबरच विजय क्लब दादर, लोकसेना, सहकार (भास्कर केरकरांचा संघ) यांनी आघाडी राखली. १९७० ते १९८० दरम्यान विजय क्लब दादर, अमर हिंद मंडळ, विद्युत, युवक, रुईया समवेत वैभव स्पोर्टस्, पार्ले स्पोर्टस् क्लब व आर.बी.आय. (वाईरकरसरांचा) असे संघ जोमात खेळत होते. १९८५ साली मुंबईतून मुंबई शहर व मुंबई उपनगर असे दोन नवीन संघ उदयास आले. मुंबई उपनगरचे प्रणेते होते प्रकाश चव्हाण व बाप्पा रेडकर तर मुंबईकडे प्रमुख संघटक होते श्री पैगावकर, आबा नाईक, उमेश शेणाय इ. १९८० ते १९९० दरम्यान विजय क्लब, अमर हिंद मंडळ याबरोबरच सरस्वती स्पोर्टस् क्लबने चांगला संघ तयार केला. मात्र काही वर्षातच तो बंद झाला. १९९० मध्ये शिवनेरी (पूर्वीची ​ना​वे – ग्रेटर बॉम्बे पोलीस संघ, श्री साई), अमर हिंद मंडळ व विजय अशा चांगल्या लढती पहायला मिळायच्या, मात्र २००० नंतर शिवनेरी, पवन स्पोर्टस् क्लब व श्री समर्थ व्यायाम मंदिर यांनी जुन्या मातब्बर संघांची जागा घेतली. २००३ नंतर मुंबईतील महिला संघांची अवस्था बिकट होत अंतिम फेरी खेळणारा हा संघ राज्यात कसाबसा १ ल्या आठ स्थानात येतो या स्थितीत आलेला आहे. महिलांमध्ये कुमूद पुरंदरे, अरुणा कारखानीस (विजय), सुहास मांजरेकर, प्रतिभा गोखले, हेमा नरवणकर, वासंती तळवलकर, लता सावंत, मंगला नागले, उषा मोरे, सुरेखा नाईक इ. प्रचंड दम असणारे खेळाडू होत्या. मधल्या काळात शुभांगी कोंडुस्कर, माधवी कदम, वैशाली वेदक, दीप्ती दळवी यांनी मैदाने गाजवली तर आताची अग्रेसर आणि ज्यांनी मैदाने गाजवली अशा मुली म्हणजे साजल पाटील, अनुष्का प्रभू, दर्शना सकपाळ व मधुरा पेडणेकर.