खो खो एक सर्वांगसुंदर भारतीय खेळ

लेखक – अ‍ॅड. अरुण देशमुख 

खो-खो ला निश्चित असा इतिहास नाही. याबाबत अनेकांनी प्रामाणिक प्रयत्न करूनही ठोस असा पुरावा कुणालाच मांडता आला नाही. याबाबत अनेक तर्क मात्र लढवलेले गेले आहेत, त्यातील एक म्हणजे महाभारतातील बर्‍याच बाबी ह्या खेळाशी साधर्म्य दाखवतात. कर्णाचा साथीदार शल्य उत्तम अश्वचालक होता. तसेच कृष्णही उत्तम अश्वचालक होता.

 ​युद्धात रथांच्या सहाय्याने भेदला जाणारा रथोद नावाचा व्युह असो व तो भेदण्यासाठी चाल असो यात दोघेही आपले रथ एकेरी साखळी पद्धतीने टाकत पुढे मार्ग काढत जायचे. अभिमन्यु जेव्हा कौरवांचे चक्रव्यूह भेदत आत शिरला​​ ते तंत्र गोलातला खेळ तोडणे ह्या तंत्राशी साधर्म्य दाखवते. मात्र एवढ्याश्या उदाहरणावरून खो-खो ची उत्पत्ती महाभारत काळापासून झाली असे म्हणणे धाडसाचे ठरेल. आपल्या संतांच्या ओव्यांमधेही खो-खो चा उल्लेख असल्याचा दाखला अनेकजण देतात.

भारतीय मंत्रोच्चारात श्री सिद्धकुंजिकास्त्रोतात श्री पार्वती देवीच्या मंत्रात खां खी खू खेचरी तथा ! असा शब्दोचार आढळतो जसा ओम ह्या मंत्रोच्चारात आपले स्वर पोटाच्या बेंबीपासून येतात तसाच काहीसा खो या उच्चारात स्वर पोटाच्या बेंबीपासून येतात. अर्थात प्रत्येक गोष्टीत सखोल विचार करायला गेल्यास अशा अनेक बाबी आढळून येत जातात, असो.

श्री. रमेश वरळीकर यांनी त्यांच्या खो-खो पुस्तकात मांडलेल्या खालील तर्क पटण्यालायक वाटतो. आपला देश हा शेतीप्रधान आहे. पिकांनी भरलेली शेती जनावरांनी खराब करू नये म्हणून जे विविध उपाय योजले जात असत, त्यापैकी, त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण करून त्यांना पळवून लावणे हा प्रमुख उपाय असे. त्यासाठी शेतात काही ठराविक अंतरावर लहान मुले एकमेकांच्या विरुद्ध दिशेला तोंड करून बसवून त्यांना कुत्राच्या भुंकण्याचा आवाज (भो भो) क​​रा​यला सांगितले जात असावे. असे या शेत (क्षेत्र) रक्षण वृत्तीतून लहान मुलांचा खो-खो खेळ-पळती / पाठलागाचा सुरु झाला असावा. (संदर्भ खो-खो, पान १, लेखक – श्री. रमेश वरळीकर, संपादक / प्रकाश: ग्रंथाली ज्ञानयज्ञ, साल २००० ) एक मात्र निश्चित कि खो-खो या शब्दाचे मुळ शोधणे जरी अवघड असले तरी या खेळाचे आट्यापाट्या व लंगडी खेळांशी नक्कीच नाते असावे. या दोन खेळांची उत्तम सांगड घालत आवश्यक ते बदल घडत हा खेळ तयार झाला असावा असे मला व्यक्तिश: वाटते.

२० व्या शतकात खर्‍या अर्थाने खो-खो चा नियमबद्ध असा खेळ सुरु झाला. खो-खो हा मातीत खेळ जाणार खेळ असून फक्त प्रायोगिक स्तरावर म्हणून लाकडी मैदानावर​ ​​(​Wooden Court​)​ कोलकाता येथे आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या वेळी आशियाई स्पर्धा खेळला गेला आहे. मात्र माती व गवताच्या मैदानावर खेळला जाणारा हा रांगडा खेळ त्याच जोमात लाकडी मैदानावर फुलत नाही व त्याच तंत्रांनी खेळता येत नाही. त्यामुळेच स्वत:चे सत्व अबाधित ठेवण्याचा प्रयत्न भारतीयांनी केले पाहिजे अन्यथा इतर भारतीय खेळांसारखीच ह्याचीही शोकांतिका होईल. हॉकीत कुत्रिम गवताचे मैदान तर कुस्तीत माती ऐवजी मेटवर असे बदल त्या खेळांना आंतरराष्ट्रीय बनवून गेले मात्र त्याचा फटका भारतीयांनाच बसला. भारतात खेळासाठी असणार्‍या पायाभूत गोष्टीच्या अभावामुळे एकतर फक्त काही ठिकाणीच असा महागडा सराव नाईलाजाने करायला मिळतो व शेवटी त्या-त्या खेळात पिछेहाट होत गेली. खेळांमध्ये नियम बदलांमुळे (मैदानाचे अंतर, पाळीची वेळ, स्तंभ रेषेची जागा इ.) खेळांमध्ये नवीन तंत्रे आली तर खेळ जलद अनेक दिग्गज खो-खो प्रेमींच्या अथक प्रयत्नातुनच हा खेळ काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत व त्रिपुरापासून गुजरात पर्यंत सर्व राज्यात हा खेळ खेळला आहे.