मुंबई खो खो संघटनेची सन २०१९-२० व  २०२०-२१ ची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक ३० ऑक्टोबर, २०२१ रोजी सायंकाळी ६.०० वाजता पिपल्स जिमखाना सभागृह, विद्यार्थी क्रीडा केंद्र, लाल मैदान, आई माई मेरवानजी स्ट्रीट, परळ, मुंबई येथे संपन्न झाली. सभेचे सूत्र संचालन संघटनेचे सदस्य ऍड. अरुण देशमुख यांनी केले. अध्यक्ष मान. श्री. शिवकुमार लाड यांनी सभेचे अध्यक्षस्थान भूषविले. या सभेसाठी महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या सहकार्यवाह सौ. गंधाली पालांडे या राज्य निरीक्षक म्हणून उपस्थित होत्या.

सभेच्या सुरवातीस अहवाल काळात निधन झालेल्या सर्वांना श्रद्धांजली वाहण्यात आली. व्यासपीठावर संघटनेचे अध्यक्ष श्री. शिवकुमार लाड, कार्याध्यक्ष श्री. सुधाकर राऊळ, राज्य संघटनेचे खजिनदार व सदस्य ऍड. अरुण देशमुख व श्री. सुरेंद्रकुमार विश्वकर्मा यांचे सोबत खजीनदार श्री. जतीन टाकळे उपस्थित होते.

संघटनेचे माजी सचिव ऍड. अरुण देशमुख यांनी अध्यक्षाच्या परवानगीने सभेचे विषय पत्रिकेनुसार कामकाज सुरु केले. उपस्थित सर्व सभासदांना सन २०१९-२० व  २०२०-२१ चा अहवाल देण्यात आला. यात वर्षभरात मुंबई जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा व इतर कार्यक्रमासोबतच राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंची यादी, संघटनेने यंदा घेतलेल्या पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेची माहिती, राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्राविण्य मिळविलेल्या सर्व मान्यवरांची माहिती, यंदाचे जेष्ठ कार्यकर्ता पुरस्कार्थी यांची माहिती अशी अनेक उपयुक्त माहिती या अहवालात समाविष्ट करण्यात आली होती.

दरवर्षी प्रमाणे यंदाही जेष्ठ कार्यकर्ता पुरस्कार कार्यक्रम पार पडला. खो खो खेळासाठी व संघटनेसाठी ज्यांनी आपले आयुष्य वेचले, प्रचार व प्रसारासाठी अमुल्य वेळ दिला, वेळप्रसंगी स्वत:च्या खिशात हात घालून या खेळाला लौकिक मिळवून देण्यासाठी झटले त्या जेष्ठ कार्यकर्त्यांना कै. एकनाथ साटम पुरस्कार दिला जातो. सन्मान चिन्ह, स्मृती चिन्ह, शाल – श्रीफळ व रुपये ५,०००/- असे या पुरस्काराचे स्वरूप असते. यंदा संघटनेने श्री. प्रभाकर वाईरकर (विद्यार्थी क्रीडा केंद्र), श्री. वैजनाथ वैद्य (वैभव स्पोर्ट्स क्लब), श्री. अरुण देशपांडे (अमर हिंद मंडळ) व श्री. भालचंद्र चांदोरकर (ब्राह्मण सेवा मंडळ) यांना हा पुरस्कार संघटनेचे अध्यक्ष श्री. शिवकुमार लाड यांच्या शुभहस्ते देऊन त्यांचा कार्याचा गौरव केला. या सोहळ्यास या सर्व पुरस्कार्थीचे नातलग व मित्र परिवार मोठया संख्येने हजर होता. सदर पुरस्कार्थीनी पुरस्काराबद्दल संघटनेचे आभार मानत कृतघ्नता व्यक्त केली व आजही आपण संघटनेस मदत करण्यास तयार असल्याची ग्वाही दिली.

विषय पत्रिकेवरील सर्व विषय संपल्यावर सौ. गंधाली पालांडे यांनी सभेचे निरीक्षक म्हणून आपले मत मांडतांना मुंबई खो खो संघटना नेहमी खेळासाठी आघाडीवर कार्य करीत असते. त्यामुळे महाराष्ट खो खो असोसिएशनला संलग्न असलेले सर्व जिल्हे मुंबईकडे खूप वेगळ्या आशेने बघत असतात. या संघटनेच्या वार्षिक सभेस निरीक्षक म्हणून उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद त्यांनी व्यक्त केला.

शेवटी अध्यक्ष श्री. शिवकुमार लाड यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्व उपस्थितांचे तसेच संलग्न संस्था व सभासदांचे आभार मानले. संघटनेच्या वाटचालीबद्दल आपले मत व्यक्त केले. सर्व सन्मानीय कार्यकारिणी सदस्य खेळाच्या प्रचारासाठी व प्रसारासाठी घेत असलेल्या मेहनतीचे विशेष कौतुक केले व भविष्यात पुन्हा गतवैभव प्राप्त करू असे आश्वस्त केले. ज्येष्ठ कार्यकर्ते व कै. एकनाथ साटम पुरस्कार प्राप्त सत्कारमूर्तीबद्दल गौरवोद्गार काढत खो खोसाठी भविष्यातही असेच सहकार्य करण्याची विनंती केली.

राज्य निरीक्षक सौ. गंधाली पालांडे यांना अध्यक्ष श्री. शिवकुमार लाड यांनी  पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले. श्री. सुरेंद्रकुमार विश्वकर्मा या वार्षिक सर्वसाधारण सभेकरीता उपस्थितांचे आभार मानत सभा संपल्याचे जाहीर केले.