मुंबई खो खो संघटनेची सन २०१८-१९ ची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक १० ऑगस्ट, २०१९ रोजी सायंकाळी ७.०० वाजता सक्कर भवन, रफी अहमद किडवाई मार्ग, वडाळा येथील वातानुकुलीत सभागृहात संपन्न झाली. सभेचे सूत्र संचालन संघटनेचे सचिव ऍड. अरुण देशमुख यांनी केले. अध्यक्ष मान. श्री. शिवकुमार लाड यांनी सभेचे अध्यक्षस्थान भूषविले. या सभेसाठी आंतरराष्ट्रीय​ पंच, महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या पंच मंडळाचे सचिव व मुंबई उपनगर जिल्हा खो खो असोसिएशनचे सचिव श्री. प्रशांत पाटणकर हे राज्य निरीक्षक म्हणून उपस्थित होते. सभेच्या सुरवातीस अहवाल काळात निधन झालेल्या सर्वांना श्रद्धांजली वाहण्यात आली. व्यासपीठावर संघटनेचे उपाध्यक्ष श्री. तुषार सुवे, श्री. अरुण देशपांडे, कार्याध्यक्ष श्री. बाळासाहेब तोरसकर, सचिव ऍड. अरुण देशमुख यांचे सोबत खजीनदार श्री. पुष्पराज बागायतकर उपस्थित होते.

संघटनेचे सचिव ऍड. अरुण देशमुख यांनी अध्यक्षाच्या परवानगीने सभेचे विषय पत्रिकेनुसार कामकाज सुरु केले. उपस्थित सर्व सभासदांना सन २०१८-१९ चा रंगीत अहवाल देण्यात आला होता. यात वर्षभरात मुंबई जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा व इतर कार्यक्रमासोबतच राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंची यादी, संघटनेने यंदा घेतलेल्या पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेची माहिती, राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्राविण्य मिळविलेल्या सर्व मान्यवरांची माहिती, यंदाचे जेष्ठ कार्यकर्ता पुरस्कार्थी यांची माहिती अशी अनेक उपयुक्त माहिती या अहवालात समाविष्ट करण्यात आली होती.

दरवर्षी प्रमाणे यंदाही जेष्ठ कार्यकर्ता पुरस्कार कार्यक्रम पार पडला. खो खो खेळासाठी व संघटनेसाठी ज्यांनी आपले आयुष्य वेचले, प्रचार व प्रसारासाठी अमुल्य वेळ दिला, वेळप्रसंगी स्वत:च्या खिशात हात घालून या खेळाला लौकिक मिळवून देण्यासाठी झटले त्या जेष्ठ कार्यकर्त्यांना कै. एकनाथ साटम पुरस्कार दिला जातो. सन्मान चिन्ह, स्मृती चिन्ह, शाल – श्रीफळ व रुपये ५,०००/- असे या पुरस्काराचे स्वरूप असते. यंदा संघटनेने श्री. प्रदीप पाटील (सहकार कला क्रीडा केंद्र), श्री. बाळकृष्ण सावंत (विद्यार्थी क्रीडा केंद्र), श्री. पांडुरंग परब (विजय क्लब), श्री. प्रभाकर साळुंखे (युवक क्रीडा मंडळ) व श्री. संजय पेडणेकर (अमर हिंद मंडळ) यांना हा पुरस्कार संघटनेचे अध्यक्ष श्री. शिवकुमार लाड यांच्या शुभहस्ते देऊन त्यांचा कार्याचा गौरव केला. या सोहळ्यास या सर्व पुरस्कार्थीचे नातलग व मित्र परिवार मोठया संख्येने हजर होता. पुरस्कार्थीबद्दल श्री. तुषार सुर्वे, ऍड. अरुण देशमुख, श्री. पुष्पराज बागायतकर यांनी आपल्या आठवणी सभागृहास सांगितल्या. सदर पुरस्कार्थीनी सुद्धा पुरस्काराबद्दल संघटनेचे आभार मानत कृतघ्नता व्यक्त केली व आजही आपण संघटनेस मदत करण्यास तयार असल्याची ग्वाही दिली. ​ श्री. प्रदीप पाटील यांनी पुरस्कारस्वरूप मिळालेले रु. पाच हजार संघटनेस परत देत सांगितले कि हे पैसे संघटनेच्या कुमार व मुली गटासाठी वापरावेत, तसेच दरवर्षी या गटासाठी मी एवढीच रक्कम मदत म्हणून देईन. 

संघटनेचे अध्यक्ष श्री. शिवकुमार लाड यांनी मुंबई खो खो संघटनेच्या सांकेतिक स्थळाची जबाबदारी पार पडणाऱ्या श्री. सचिन पिळणकर व श्री. निलेश परब यांचेही पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. .

विषय पत्रिकेवरील सर्व विषय संपल्यावर श्री. प्रशांत पाटणकर यांनी सभेचे निरीक्षक म्हणून आपले मत मांडतांना मुंबई जिल्हा नेहमीच खो खो खेळासाठी आघाडीवर कार्य करीत असतो तसेच मुंबई जिल्हा हा खो खोतील प्रगत जिल्हा असून वर्षभर या जिल्ह्यात विविध स्पर्धांची मांदियाळीच असते. त्यामुळेच महाराष्ट खो खो असोसिएशनला संलग्न असलेले सर्व जिल्हे मुंबईकडे खूप वेगळ्या आशेने बघत असतात. येत्या वर्षात अल्टिमेट खो खो स्पर्धेसोबतच अनेक स्पर्धा येऊ घेतल्या आहेत. काही महिन्यांनी कोरिया व दुबई येथे आंतरराष्ट्रीय सामने त्या त्या देशांसोबत होणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. त्यामुळे भविष्यात भारतीय खो खो खेळाचा दर्जा निश्चित आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावणार यात शंकाच नाही असे मत व्यक्त केले. या संघटनेच्या वार्षिक सभेस निरीक्षक म्हणून उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद त्यांनी व्यक्त केला.

शेवटी अध्यक्ष श्री. शिवकुमार लाड यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्व उपस्थितांचे तसेच संलग्न संस्था व सभासदांचे आभार मानले. संघटनेच्या वाटचालीबद्दल आपले मत व्यक्त केले. सर्व सन्मानीय कार्यकारिणी सदस्य खेळाच्या प्रचारासाठी व प्रसारासाठी घेत असलेल्या मेहनतीचे विशेष कौतुक केले व भविष्यात पुन्हा गतवैभव प्राप्त करू असे आश्वस्त केले. ज्येष्ठ कार्यकर्ते व कै. एकनाथ साटम पुरस्कार प्राप्त सत्कारमूर्तीबद्दल गौरवोद्गार काढत खो खोसाठी भविष्यातही असेच सहकार्य करण्याची विनंती केली.

राज्य निरीक्षक श्री. प्रशांत पाटणकर यांना अध्यक्ष श्री. शिवकुमार लाड यांनी  पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले. कार्याध्यक्ष श्री. बाळासाहेब तोरसकर यांनी या वार्षिक सर्वसाधारण सभेकरीता उपस्थितांचे, तसेच श्री. शिवकुमार लाड यांनी सभेसाठी सभागृह व स्नेह भोजन आयोजीत केल्याबद्दल त्यांचेही आभार मानत सभा संपल्याचे जाहीर केले.

काही क्षणचित्रे …….