मुंबई खो खो संघटनेच्या विद्यमाने यु .आर. एल फौंडेशन व अमर हिंद मंडळ यांच्या सहकार्याने मुंबई जिल्ह्यातील पंच व प्रशिक्षक यांच्या करीता शनिवार दिनांक ९ जून, २०१८ रोजी सायंकाळी ५ ते १० या वेळात अमर हिंद मंडळ, दादर येथे  कार्यशाळेचे आयोजीत करण्यात आले होते.

या कार्यशाळेच्या आयोजनासाठी संघटनेचे सचिव अॅड. अरुण देशमुख यांच्यासोबत श्री. सुरेंद्रकुमार विश्वकर्मा (सहकार्यवाह व पंच मंडळ – अध्यक्ष), श्री. महेश करमळकर (पंच मंडळ – सचिव), श्री. श्रीकांत गायकवाड व श्री. जतीन टाकळे (सहकार्यवाह) यांनी विशेष मेहनत घेतली. श्री. जतीन टाकळे यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. एकूण ६९ पंच व प्रशिक्षक यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.

या कार्यशाळेस खो खो क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यात ज्येष्ठ सांख्यिक तज्ञ श्री. रमेश वरळीकर, अॅड. अरुण देशमुख, श्री. बाळासाहेब तोरसकर, श्री. तुषार सुर्वे, श्री. अरुण देशपांडे, श्री. पुष्पराज बागायतकर, श्री. सुधाकर राऊळ, श्री. विकास पाटील, श्री. सुरेंद्रकुमार विश्वकर्मा, श्री. पराग आंबेकर, श्री. महेश करमळकर व श्री. प्रफुल्ल पाटील  यांचा समावेश होता.

पहिल्या सत्रात अॅड. अरुण देशमुख यांनी खेळाडूंनी सरावापूर्वी व नंतर करावयाच्या शरीरतापन, शरीर शितलीकरण यासोबत उपयोगी योगासनांची माहिती दिली तर डॉ. ऋचा गाडगीळ (Physiotherapist) यांनी खेळाडूंना होणाऱ्या शारीरिक जखमा, दुखापती, जायबंदी याबाबत उपस्थित प्रशिक्षकांना अत्यंत उपयुक्त माहिती दिली.

दुसऱ्या सत्रात श्री. सुधाकर राऊळ व श्री. पराग आंबेकर या राष्ट्रीय प्रशिक्षकांनी खेळाडूंच्या सरावाची वेळ, सरावाची पद्धत, आहार, वैयक्तिक तसेच सांघिक सराव, खेळातील कौशल्य सराव इत्यादी विषयांबाबत माहिती दिली तसेच उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली.

तिसऱ्या सत्रात मुंबई जिल्ह्यात खो खो खेळाच्या प्रचार व प्रसार याकरीता उपाय योजना, संघटनेच्या संघांचा दर्जा वाढविणे, क्रीडा शिबीर, विविध स्पर्धांचे आयोजन, प्रसिद्धी इत्यादी मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यात अनेक गोष्टींवर दिलखुलास व सकारात्मक चर्चा झाली.

चौथे सत्र हे खो खो पंचाकरीता होते. यात श्री. सुरेंद्रकुमार विश्वकर्मा व श्री. महेश करमळकर यांनी उपस्थित पंचांना खेळातील नवीन नियमांबाबत मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित नवीन पंचांना नियमांची उकल करून सांगण्यात आली.

शेवटच्या सत्रात श्री. सुधाकर राऊळ, श्री. विकास पाटील, श्री. निलेश परब, श्री. पराग आंबेकर व श्री. पुष्पराज बागायतकर यांनी पंचांची निर्णय क्षमता, दक्षता, संशयास्पद निर्णय, फिटनेस याबरोबरच मागील काही सामन्यांबाबत मार्गदर्शन केले.

कार्यशाळेचा समारोप श्री. रमेश वरळीकर यांच्या हस्ते करण्यात आला. सर्व उपस्थितांना मुंबई खो खो संघटनेचे अध्यक्ष श्री. शिवकुमार लाड यांच्या यु .आर. एल फौंडेशनतर्फे चहा नाश्ता व भोजन देण्यात आले.

काही क्षणचित्रे ….