लेखक – अॅड. अरुण देशमुख (खो खो एक सर्वांगसुंदर भारतीय खेळ)
महाराष्ट्रात खो-खो खेळाची बांधणी पुण्याच्या डेक्कन जिमखान्याने केली. १९१४-१९१५ साली स्पर्धात्मक खो-खो ची वाटचाल सुरु झाली. सुरवातीच्या कालखंडात अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळ क्रीडा स्पर्धांचे एकहाती नियोजन करीत होती. त्यानंतरच्या काळात एक खेळ एक संघटना या तत्वाचा बहुतांशी खेळांनी स्वीकार केला तरी महाराष्ट्रात १९६० ते १९६५ ह्या दरम्यान महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व महामंडळ अशा दोन संघटना समांतर काम करू लागल्या. त्यात महामंडळाच्या बाजूने पालकसर (विजय क्लब), गोसावीसर (विद्यार्थी), पंतसर (चेंबूर क्रीडा मंडळ), हरीभाऊ साने (पुणे) व विदर्भातील काही मंडळी होती. तर महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या बाजूने युवक क्रीडा मंडळ, विद्युत व इतर अशा दोन फळ्यात कार्यकर्ते विभागले गेले. कालांतराने चर्चेअंती महामंडळ हे महाराष्ट्र खो-खो असोसिएशनमध्ये विलीन झाले. त्याचबरोबर विदर्भासाठी वेगळी संघटना निर्माण होत एकूणच वितुष्ट संपले. आज महाराष्ट्रातून महाराष्ट्र, विदर्भ व कोल्हापूर अशा तीन संघटना भारतीय खो-खो फेडरेशनला संलग्न आहेत. पूर्वी काही विशिष्ट केंद्रांभोवती फिरत राहणार्या या महाराष्ट्र खो-खो असोसिएशनमध्ये आज नुसतेच खेळाडू नाही तर सत्तेचेही बर्यापैकी विकेंद्रीकरण झालेले पहावयास मिळते. पुरुषांच्या गटात पुण्या – मुंबईच्या संघासोबत मुंबई उपनगर, ठाणे हे संघ तर खालच्या तर खालच्या गटात धुळे, सोलापूर, सातारा, सांगली, उस्मानाबाद, अहमदनगर असे संघच नाही तर परभणी-हिंगोली सारखे संघही शेवटच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारू लागलेत. तर महिलांच्या गटात एकेकाळी फक्त पुण्या – मुंबईच्याच खेळाडूंची सद्दी चालायची. आज महिलांमध्ये मुंबई १ ल्या आठ संघात कसेबसे स्थान मिळवतो तर इथे सातारा, उस्मानाबाद, मुंबई उपनगर, सांगली व बीडच्या संघांनी बर्यापैकी आघाडी मिळवली आहे. अर्थात या खेळत सर्व काही आलबेल चालले आहे असेही काही नाही. पुणे – मुंबईतील अनेक नामवंत संघ काळाच्या ओघात जवळ जवळ नामशेष झालेत.